‘माँ, मै फिदायीन मिशन पें हूं’

By admin | Published: January 3, 2016 04:55 AM2016-01-03T04:55:30+5:302016-01-03T04:55:30+5:30

पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील

'Mother, I am seeking a fidayeen mission' | ‘माँ, मै फिदायीन मिशन पें हूं’

‘माँ, मै फिदायीन मिशन पें हूं’

Next

नवी दिल्ली / पठाणकोट : पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील संभाषणावरून गुप्तचर संस्थांना मिळाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एवढेच नव्हे, तर या अतिरेक्याने गुरुदासपूरच्या जिल्हा अधीक्षकांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरून पाकिस्तानातील आपल्या आईला हा फोन केला असावा, असे दर्शविणारी माहितीही समोर आली आहे.
सूत्रांनुसार, गुरुदासपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे शुक्रवारी त्यांच्या जीपसह अपहरण केले गेल्यानंतर दिल्लीतील गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या होत्या व इतर अनेक गोष्टींबरोबर त्यांनी पठाणकोटमध्ये येणारे व तेथून बाहेर जाणारे फोन ‘ट्रॅक’ करण्यास सुरुवात केली. अशाच एका पठाणकोटच्या परिसरातून पाकिस्तानात केल्या गेलेल्या फोनवरील संभाषण ‘ट्रॅक’ केले गेले. हे संभाषण नंतर पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणाऱ्यांपैकी एक अतिरेकी व त्याची पाकिस्तानातील आई यांच्यातील आहे. यात हा अतिरेकी त्याच्या आईला, ‘माँ मैं फिदायीन मिशन पे हूं’, असे सांगत असल्याचे ऐकू येते. एवढेच नव्हे, तर पलीकडच्या बाजूने, आपला मुलगा कदाचित परत दिसणारही नाही याचे भान असूनही, आई या अतिरेक्याला ‘मिशन पे जाने के पहले पेटभर खाना खा लेना बेटा,’ असे सांगतानाही या संभाषणात ऐकू आल्याचे समजते.
मात्र, आई व मुलगा यांच्यातील या संभाषणात दोघांनीही आपली ओळख उघड करण्याची गरज न पडल्याने हा अतिरेकी नेमका कोण? तो मारला गेला की अजूनही दडून राहिला आहे, या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळालेली नाहीत. अर्थात, संबंधित मोबाइल कंपनीकडून ‘कॉल रेकॉर्ड’ घेऊन त्याची छाननी केल्यावर, या संभाषणासाठी वापरला गेलेल्या मोबाइलचा सिम कार्ड नंबर काय? तो कोणाचा आहे व पाकिस्तानात कोणत्या मोबाइल क्रमांकावर फोन केला गेला होता, हा तपशील कालांतराने हाती येऊ शकेल.
अधीक्षकांचा मोबाइल चोरला
अपहरण करून नंतर धावत्या जीपमधून बाहेर फेकून दिलेले
पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांच्या पोलीस अंगरक्षकाने आणि जीपच्या चालकाने नंतर पोलीस ठाण्यात जाऊन जी माहिती दिली, त्यावरून अतिरेक्यांनी अधीक्षकांच्या चोरलेल्या मोबाइल फोनचा तर वापर केला नसावा ना? अशी शक्यताही दिसते.
गेली पाच वर्षे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे कुलविंदर सिंग साहेबांचे जीपसह अपहरण केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत नव्हते. कुलविंदर यांनी पोलिसांना सांगितले की, एसपी साहेबांच्या अपहरणाची माहिती कळली, तेव्हा आम्ही त्यांच्या मोबाइलवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ३ वाजून २६ मिनिटांनी फोन लागला.
मी ‘हॅलो’ म्हटल्यावर पलीकडच्या बाजूने ‘सलाम वालेकुम’ असे उत्तर आले. त्यावर मी ‘आप कौन?’ असे विचारल्यावर पलीकडच्या बाजूच्या व्यक्तीनेही मला ‘आप कौन?’ असे विचारले. हा आमच्या एसपी साहेबांचा नंबर आहे, असे सांगितल्यावर फोन घेणाऱ्याने ‘कौन एसपी साहब’ असे उलट विचारले. त्यानंतर मी बराच वेळ ‘हॅलो, हॅलो’ करत राहिलो, पण पलीकडून फोन बंद केला गेला.
अधीक्षक सलविंदर सिंग यांचे ड्रायव्हर राजपाल सिंग यांनीही सांगितले की, ‘घडलेली घटना कळल्यावर मीही एसपी साहेबांच्या दोन्ही मोबाइल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागला नाही.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: 'Mother, I am seeking a fidayeen mission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.