४ मुलांसह आईची विहिरीत उडी; भय वाटले म्हणून स्वत: बाहेर पडली, ३ चिमुरड्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:48 AM2023-03-28T09:48:53+5:302023-03-28T09:51:10+5:30
तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली
मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून रविवारी ३० वर्षीय महिलेने तिच्या ४ मुलांसह विहिरीत उडी मारली. यात ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला आणि तिची मुलगी वाचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला आणि मुलीवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत.
भय वाटले म्हणून बाहेर आली महिला
जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने ४ मुलांसह विहिरीत उडी मारली परंतु त्यानंतर महिलेला भय वाटले तेव्हा तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली. परंतु या घटनेत महिलेची तिन्ही मुले मृत पावली. ज्यात १८ महिन्याचा मुलगा, ३ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३ मृत मुलांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत.
पतीसोबत झालं होतं भांडण
पोलीस अधीक्षक राहुल कुमार म्हणाले की, ही घटना बुऱ्हानपूरच्या जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली. या महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. या महिलेचे पती रमेशसोबत भांडण झाले होते. ज्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलले. सध्या प्रमिला आणि तिची ७ वर्षाची मुलगी दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीविताला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस तपास सुरू
प्रमिलाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून ३ मृतदेह काढण्यात आले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी पोलीस शोधत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बुऱ्हानपूरच्या नेपानगर डवाली खुर्द गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली होती. याठिकाणी घरात पती पत्नीसह ३ अल्पवयीन मुलांचा मृतदेह आढळला. हे सर्व मृत मुले १० वर्षापेक्षा कमी वयाचे होते. युवकाने पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर गळफास घेत आत्महत्या केली होती.