प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं आईला, मुलाचाच काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:56 PM2019-01-28T12:56:43+5:302019-01-28T13:09:29+5:30
आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाची निर्घृण हत्या केली.
नवी दिल्ली - आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राजधानी नवी दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. रविंद्र असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.
नेमकी काय आहे घटना?
शनिवारी (26 जानेवारी) रात्री रविंद्र कामाहून घरी परतला तेव्हा त्यानं आईला प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत पाहिले. त्या दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहून रविंद्रचा संताप अनावर झाला. यानंतर तिघांमध्ये वादावादीही झाली. या वादाचे पर्यवसान हत्येच्या घटनेत झाले. आईनं प्रियकरासोबत मिळून मुलाचाच काटा काढला. रात्रभर मुलाचा मृतदेह तिनं खोलीमध्येच ठेवला.
मुलाचा जीव रस्ते अपघातातून गेल्याचा तिनं भासवण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिनं रुग्णवाहिकादेखील बोलावली. पण आरोपी महिलेनं केलेला गुन्हा फार काळ टिकला नाही. कारण, रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्यानं याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली. यानंतर आरोपी आई त्याच्या मुलासहीत फरार झाली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत रक्तानं माखलेली वीट ताब्यात घेतली. शिवाय, रविंद्रचा मृतदेह ताब्यात घेत तपासदेखील सुरू केला आहे.
आरोपी महिला 10 मुलांची होती आई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र मूळचा उत्तर प्रदेशातील खरैया गावातील रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत नवी दिल्लीत भाडेतत्त्वावर राहत होता. रविंद्रचे दोन भाऊदेखील येथेच वास्तव्यास होते. त्याचे वडील गावामध्ये चार मुलींसोबत राहताहेत. यातील तीन मुली विवाहित आहेत.
पोलिसांना केले गजाआड
पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी आरोपी महिला आपल्या लहान मुलासहीत आझादपूरमधील रहिवासी असलेल्या जावयाच्या घरी पोहोचली. येथे तिनं रविंद्रचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची खोटी कहाणी सांगितली. पण, तिच्या जावयानं पोलिसांनी याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत रविंद्रची कपड्याच्या मदतीनं गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याच्या डोक्यावर विटेचा मारा करुन रविंद्रचा अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा गुन्हा फार काळ लपून राहिला नाही. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींचा छडा लावलाच.