३ महिन्याच्या बाळाच्या आईला रात्री ३ वाजता ईमेल वाचून बसला शॉक; नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 04:23 PM2022-11-11T16:23:08+5:302022-11-11T16:23:37+5:30
META मध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या नीलिमा अग्रवाल यांनी दोन दिवसांपूर्वी 'लिंक्डइन' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती.
नवी दिल्ली - मेटा ही सोशल मीडियाच्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे तीन लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप आहेत. या मोठ्या सोशल मीडिया कंपनीने अलीकडेच आपल्या ११००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामध्ये अनेक भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्याच वेळी, असे काही लोक आहेत ज्यांनी नुकतेच हातातला जॉब सोडून काही दिवसांपूर्वी मेटामध्ये नोकरीला सुरुवात केली. परंतु मेटाने त्यांना देखील काढून टाकले आहे.
META मध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या नीलिमा अग्रवाल यांनी दोन दिवसांपूर्वी 'लिंक्डइन' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, त्या मेटाच्या ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं त्यापैकी एक आहेत. मेटामधील नोकरीमुळे आठवडाभरापूर्वी भारतातून कॅनडामध्ये शिफ्ट झाली आहे. यासाठी मला अनेक दिवस चाललेल्या दीर्घ व्हिसा प्रक्रियेतून जावे लागले, परंतु दुर्दैवाने काही दिवसांनी मला काढून टाकण्यात आले.
मी हैदराबादच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये गेली दोन वर्षे काम करत होती आणि मेटाच्या ऑफरमुळे तिने तो जॉब सोडला. परंतु आता तिच्याकडे मायक्रोसॉफ्टची नोकरी नाही किंवा मेटाचीही नाही. विश्वजित झा नावाच्या भारतीय मेटा कर्मचाऱ्याचीही अशीच कहाणी आहे. त्याने सांगितले की मला मेटामध्ये नोकरी सुरू करून फक्त ३ दिवस झाले होते, तरीही त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. या लोकांपैकी एक म्हणजे अनिका पटेल, जी मेटामध्ये कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून काम करत होती. अनिका भारतीय वंशाच्या महिला आहेत. प्रसूती रजेवर जात गेलेली असताना कंपनीने तिला काढून टाकले आहे.
ती आपल्या ३ महिन्यांच्या मुलीला दूध पाजण्यासाठी रात्री ३ वाजता उठली होती. त्यावेळी कर्मचारी कपातीबाबत तिला समजलं होतं. तेव्हा तिने ई-मेल तपासला तिला तीच बातमी मिळाली ज्याची भीती वाटत होती, पण त्या ई-मेलमध्ये जास्त तपशील नव्हता. पहाटे ४.३० वाजता तिला त्यांच्या व्यवस्थापकाकडून कामावरून काढून टाकल्याचा मेसेज आला. पहाटे ५.३५ वाजता बडतर्फ केल्याचा अधिकृत ई-मेल आला.