मदर टेरेसांनी धर्मांतरात कधीही भाग घेतला नाही!
By Admin | Published: February 24, 2015 11:31 PM2015-02-24T23:31:57+5:302015-02-24T23:31:57+5:30
मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.
कोलकाता/नवी दिल्ली : मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.
मदर टेरेसा या मिशनरीज आॅफ चॅरिटीत असताना धर्मांतर घडवून आणले जात नव्हते आणि आतादेखील धर्मांतर घडवून आणले जात नाही. केवळ गोरगरिबांची सेवा करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे व त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे हाच आमचा एकमेव उद्देश असतो,’ असे मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी म्हटले आहे. टेरेसा यांनी १९५० साली मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना केली होती. ‘मदर टेरेसा यांचे कार्य चांगले होते; परंतु त्यांनी केवळ लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठीच त्यांची सेवा केली,’ असे वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले होते. मदर टेरेसांनी धर्मांतरासाठी गरिबांची सेवा केली असा विचार करणेच मूर्खपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया ब्लेस्ड व्हर्जिन मेरीच्या सिस्टर एस.एम. सिरील यांनी व्यक्त केली. टेरेसा यांनी धर्मांतर घडविले असे म्हणणे चुकीचे आहे. लोक ख्रिश्चन बनतील या हेतूने त्यांनी लोकांची सेवा केली नाही, असे सिरील यांनी म्हटले.
वक्तव्याचे लेखींकडून समर्थन
लोकांना ख्रिश्चन धर्माच्या चौकटीत सामील करून घेणे हेच आपले काम असल्याचे प्रत्यक्ष मदर टेरेसा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असा दावा करून भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)