अपघातात गंभीर जखमी मुलाला मांडीवर घेऊन आई जोडत होती मदतीसाठी हात, लोक बनवत राहिले व्हिडीओ, अखेर उपचारांपूर्वीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 18:42 IST2021-11-20T18:42:07+5:302021-11-20T18:42:33+5:30
Accident News: राजस्थानमधील बालोतरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परिसरात झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाच्या बघ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला.

अपघातात गंभीर जखमी मुलाला मांडीवर घेऊन आई जोडत होती मदतीसाठी हात, लोक बनवत राहिले व्हिडीओ, अखेर उपचारांपूर्वीच झाला मृत्यू
जयपूर - अपघातात जखमी झालेल्यांचे व्हिडीओ काढण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन नेहमीच करण्यात येत असते. मात्र त्याचा समाजातील घटकांवर तितकाचा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. राजस्थानमधील बालोतरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परिसरात झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाच्या बघ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला.
संध्याकाळच्या वेळेस बिठुआ-बालोतरा मार्गावर दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात जखमी झालेल्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन एक आई मदतीसाठी विनवणी करत होती. मात्र तिथे असलेले अनेकजण बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ बनवत राहिले. बघ्यांपैकी कुणीही मदतीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार असाडा येथील महेंद्र कुमार हा त्याची आई कमला हिच्यासोबत दुचाकीवरून जात होता. वाटेत त्याच्या दुचाकीची एका अन्य दुचाकीशी धडक झाली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. मात्र अपघातानंतर तिथे असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यातील काही जण जखमींचे व्हिडीओ काढण्यात गुंतले. मात्र त्यातील कुणालाही जखमींना रुग्णालयात न्यावेसे वाटले नाही. जर तिथे उपस्थित असलेल्यांनी जखमींना वेळीच रुग्णालयात हलवले असते तर या तरुणाचे प्राण वाले असले.