माताराणी माझं काय चुकलं?, दुर्घटनेतील मृत डॉक्टरच्या पत्नीने फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 11:30 PM2022-01-01T23:30:24+5:302022-01-01T23:31:14+5:30
अजून माझ्या हातातील मेहंदीचा रंगही गेला नाही आणि माता राणीने माझा पती हिरावून घेतला. मी असं काय पाप केलं होतं?, वैष्णो माताने माझ्यासोबत असं का, माझं काय चुकलं होतं?
गोरखपूर - जम्मू काश्मीरमधील कटरा येथे असलेले श्री माता वैष्णो देवी मंदिर (Vaishnodevi Temple) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ हून अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. या घटनेतील मृतांमध्ये एका डॉक्टरांचामृत्यू झाला असून त्याबद्दल अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे महिन्यापूर्वीच 1 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह झाला होता.
अजून माझ्या हातातील मेहंदीचा रंगही गेला नाही आणि माता राणीने माझा पती हिरावून घेतला. मी असं काय पाप केलं होतं?, वैष्णो माताने माझ्यासोबत असं का, माझं काय चुकलं होतं?, असा प्रश्नांनी अर्चनाने टाहो फोडला. जम्मूतील वैष्णोदेवी मंदिर परिसरात 31 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर अरुण प्रतापसिंह यांच्या पीडित पत्नीला दु:ख अनावर झालं होतं. आपल्या सासूसमोर अर्चनासिंह आपलं दु:ख मांडत होत्या. सातत्याने सासू तारा देवी यांना फोनवरुन, अम्मा... आखीर मेरी क्या गलती है... असे म्हणत अर्चना सिंग अश्रू ढाळत होत्या.
गोरखपूर येथील रहिवाशी असलेले डॉक्टर अरुण प्रतापसिंह हे कुटुंबातील एकुलते एक सदस्य होते. रामपूर बुजूर्ग गावातील माजी सरपंच सत्यप्रकाश सिंह यांचे ते एकुलते एक चिरंजीव होते. दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच ते पत्नीला घेऊन देवदर्शनाला गेले होते. 1 डिसेंबर रोजी कुशीनगर जिल्ह्यातील पकडी गावच्या अर्चनासिंह यांच्यासमवेत त्यांचे लग्न झाले होते. डॉ. अरुण हे शहरातील शहापूर परिसरातील बायपास रोडवर हिंद हॉस्पीटल चालवत होते. मात्र, काळाने मोठा आघात सिंह कुटुंबावर केला आहे. अरुण यांच्यानंतर आता वडिल सत्यप्रकाश सिंह यांना लहान मुलगी आहे.