मुलांना जन्म दिल्यानंतर बिघडतेय आईचे आरोग्य! द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ अहवालात माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 06:42 AM2023-12-11T06:42:27+5:302023-12-11T06:42:41+5:30
दरवर्षी किमान चार कोटी महिलांना बाळाला जन्म दिल्यानंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे.
नवी दिल्ली : दरवर्षी किमान चार कोटी महिलांना बाळाला जन्म दिल्यानंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे.
‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
संशोधकांना असे आढळून आले की नैराश्याने ग्रस्त असलेल्या एक तृतीयांश (३५ टक्के) महिलांना संबंधांदरम्यान वेदना जाणवल्या. तर ३२ टक्के महिलांनी पाठीच्या खालच्या भागात दुखण्याची तक्रार केली.
नेमका काय परिणाम?
प्रसूतीनंतर महिलांवर परिणाम करणाऱ्या लक्षणांमध्ये लघवीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता (८-३१%), चिंता (९-२४%), नैराश्य (११-१७%) आणि ओटीपोटात वेदना (११%) यांचा समावेश होतो. या टीममध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संशोधकांचाही समावेश आहे.
कधीपर्यंत राहतात समस्या?
प्रसूतीनंतरच्या समस्या अनेक महिने किंवा वर्षांपर्यंत टिकून राहतात, असे अभ्यासातून समोर आले आहे. या सामान्य समस्या ओळखून त्यावर उपचार करण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.
काय कराल?
९ महिन्यांच्या गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणानंतर योग्य काळजी घेण्यामुळे पुढे येणारे धोके आणि गुंतागुंत टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सावधगिरीचा उपाय आहे.
उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत अनेक कमी-उत्पन्न आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे.
प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा महिलांच्या दैनंदिन जीवनावर, भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि तरीही तो अद्याप ओळखला जात नाही.
- डॉ. पास्केल ॲलॉट, डब्ल्यूएचओचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि संशोधन संचालक