Motivation Monday : झाडांवर प्रेम करणारा 'सिंघम' अधिकारी, पर्यावरणासाठी खर्च करतोय 70 % सॅलरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 10:02 AM2019-08-19T10:02:33+5:302019-08-19T10:03:54+5:30
Motivation Monday : हरयाणाच्या सोनीपत येथील रहिवासी देवेंद्र सुरा हे पोलीस दलात कार्यरत आहेत.
मुंबई - वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपण यावरुन नुकताच महाराष्ट्रात वाद पेटला आहे. सरकारची वृक्षसंवर्धन ही योजना थोतांड असल्याचा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी केला आहे. त्यावर, उत्तर देताना वृक्षसंवर्धन हा सरकारचा उपक्रम नसून चळवळ असल्याचं म्हटलं आहे. स्वयंप्रेरणेनं आणि पर्यावरण प्रेमातून ही चळवळ राज्यभरात उभारली जात असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या हिंमतीवर एकट्याने आत्तापर्यंत सव्वा लाख वृक्षांची लागवड केली आहे.
हरयाणाच्या सोनीपत येथील रहिवासी देवेंद्र सुरा हे पोलीस दलात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी तब्बल सव्वा लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्पही या एकट्या पर्यावरणप्रेमी पोलीस अधिकाऱ्यापुढे फिका वाटतो आहे. कारण, याने कुठलिही घोषणाबाजी न करता थेट कृतीतून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र सुरा हे आपल्या पगारातील 70 टक्के वाटा हा पर्यावरणासाठी खर्च करतात. आपल्या सहकारी मित्रांसमवेत ते पिकअप वाहनात झाडांची रोपे घेऊन गावोगावी फिरतात. शाळा, महाविद्यालये, गोशाळा, स्मशानभूमी आणि स्वयंप्रेरणेने वृक्षांची लागवड करतात. विशेष म्हणजे हुंडा आणि भेट म्हणून लग्नकार्यात ते झाडांची रोपे देतात. तर हजारो कुटुंबात जाऊन त्यांना तुळशीची रोपेही देतात. सोनीपत यांनी गोहान, मोहाली, डोरबस्सी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पिंपळाची झाडे लावली आहेत. देशभरातील कुठल्याही एका गावात पिंपळाची तुम्हाला एवढी झाडे पाहायला मिळणार नाहीत, जेवढी येथे पाहायला मिळतात.
पोलीस भरतीवेळी चंडीगढ येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे पाहून आपणास वृक्षलागवडीची प्रेरणा मिळाली. तेव्हाच आयुष्यभर वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला, असे पोलीस अधिकारी सोनीपत म्हणतात. तेथूनच पोलीस अधिकाऱ्यासोबतच पर्यावरण बचाव मोहिमेतही त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यातून, 2012 मध्ये 'जनता नर्सरी'चा जन्म झाला. या नर्सरीतून कुणीही वृक्षप्रेमी झाडं लागवण्यासाठी येथून रोप घेऊन जाऊ शकतो. चंढीगड आणि सोनीपत येथे त्यांनी दोन सायकली ठेवल्या आहेत, पर्यावरण जनजागृतीसाठी या सायकलींचा वापर करण्यात येतो.
सुरा यांनी आत्तापर्यंत, वडाची, पिंपळाची, कडुनिंबाची, तुळशीची, जांभळाची मिळून तब्बल 1 लाख 14 हजार झाडे लावली आहेत. सन 2015 मध्ये पर्यावरण वृक्षलागवडीचे अभियान चालवत, सुरा यांनी शाळा आणि रुग्णालयावरील जवळपास 500 एकर जमिनींवर वृक्षांची लागवड केली, जी वृक्षे आता झाडं स्वरुपात दिसत आहेत.