वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महागणार, नवीन कलम होणार समाविष्ट - इरडाईची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 05:16 AM2021-01-20T05:16:17+5:302021-01-20T05:21:18+5:30
मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे.
नवी दिल्ली : वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महाग होणार आहे. भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणाने (इरडाई) यासंबंधीची शिफारस केली आहे.
मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाने कितीही रकमेचे विमा संरक्षण घेतले असले तरी त्याच्या वाहन चालविण्याच्या सवयींचा विम्याच्या हप्त्यावर परिणाम होईल. जे लोक असुरक्षितरीत्या वाहन चालवतील, त्यांना सुरक्षित वाहन चालविणाऱ्यांपेक्षा जास्त विमा हप्ता पडेल.
सूत्रांनी सांगितले की, दारू पिऊन वाहन चालविल्यास १०० अंक चालकाच्या खात्यावर पडतील तसेच चुकीच्या पार्किंगसाठी १० अंक पडतील. ज्यांचे अंक २०च्या खाली असतील, त्यांना अतिरिक्त हप्ता पडणार नाही. मात्र, २१ पासून पुढच्या अंकांसाठी दंडात्मक हप्ता सुरू होईल. दुचाकी वाहनांसाठी तो १०० ते ७५० रुपये आणि चारचाकी व व्यावसायिक वाहनांसाठी ३०० ते १,५०० रुपये असेल.