आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 10:28 AM2019-08-01T10:28:48+5:302019-08-01T10:34:35+5:30
रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्लीः रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं आता वाहन चालकांना या जाचक नियमांचा सामना करावा लागणार आहे. या नव्या दुरुस्ती विधेयकानुसार रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागणार आहे. राज्यसभेत काल या विधेयकावर चर्चा करण्यात आली, त्यानंतर या विधेयकावर मतदान घेण्यात आलं असून, विधेयकाच्या बाजूनं 108 मतं, तर विधेयकाच्या विरोधात फक्त 13 मतं पडल्यानं ते पारित झालं आहे. 23 जुलै रोजी लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.
या नव्या कायद्यानुसार एखाद्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास वाहनाच्या मालकांला तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. त्या गाडीच्या मालकाला 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. तसेच अल्पवयीन मुलाला आता वय वर्षं 25 झाल्याशिवाय परवाना मिळणार नाही. वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे. त्या अल्पवयीन मुलाविरोधात किशोरवयीन न्याय ऍक्ट 2000अंतर्गत खटला चालणार आहे. या विधेयकानुसार 4 वर्षांहून अधिक वय असलेल्या लहानग्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
बेदरकारपणेगाडी चालवणं किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणं, सीट बेल्ट न बांधणं आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे. ही दंडाची रक्कम पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही.
दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. परवान्याशिवाय गाडी चालवल्यास आधी 500 रुपये दंड दिला जात होता. आता तोच दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100 रुपये दंड द्यावा लागत होता.
आता तोच दंड एक हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणंही आता महागात पडू शकते. गाडी चालवत असताना फोनवर बोलल्यास आधी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. तोच आता वाढवून 5 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणात जर कोणत्याही पीडितेचा मृत्यू झाल्यास आधी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी लागत होती. परंतु आता तीच भरपाईची रक्कम दोन लाख रुपये करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणात आपल्या गाडीच्या अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागणार आहे.