राममंदिरासाठी अयोध्येत हालचाली
By admin | Published: June 21, 2017 01:38 AM2017-06-21T01:38:36+5:302017-06-21T01:38:36+5:30
उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने
अयोध्या : उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामासाठी रामनाम कोरलेले दगड (रामशिला) आणून त्यांचा साठा करण्यास पुन्हा सरुवात केली आहे.
बाबरी मशिद- रामजन्मभूमीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम वर्षभरात सुरु केले जाईल, असे विहिंपने याआधीच जाहीर केले आहे. विहिंपचे ज्येष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी एक हजाराहून जास्त ट्रक भरून रामशिला लागणार आहेत. त्यापैकी पहिले दोन ट्रक राजस्थानमधून भरतपूर येथून सोमवारी येथे पोहोचले. त्या ट्रकमधून आणलेल्या रामशिला कारसेवकपूरम येथे उतरवून घेण्यात आल्या. बाकीच्या रामशिलांचे ट्रकही येत्या काही दिवसांत येतील व मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल, असेही पांडे म्हणाले.
सन २०१५ मध्येही विहिंपने देशभरातून अशा रामशिला आणण्याचा प्रयत्न केला होता. पण पहिले दोन ट्रक आल्यावर समाजवादी पक्षाच्या राज्य सरकारने अशा वाहतुकीसाठी लागणारे ‘फॉर्म ३९’ देणे बंद केले व रामशिलांची जमवाजमव तेवढ्यावरच थांबवली होती. पांडे म्हणाले की, महिनाभरापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटलो व त्याने लगेच ‘फॉर्म ३९’ देण्याचे आदेश काढले. (वृत्तसंस्था)
राममंदिर बांधण्यावर आपण ठाम आहोत, याचा संदेश देण्यासाठी भगव्या संघटनांची ही दगडांची जमवाजमव सुरू आहे. पण त्याने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटनेनुसार न्याय होईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.
- खलिक अहमद,
सुप्रीम कोर्टातील पक्षकार
प्रकरण न्याप्रविष्ट असूनही असे करणे बेकायदाच नव्हे तर देशविरोधीही आहे. यामुळे सांप्रदायिक तणाव वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.
- रूपरेखा वर्मा, माजी कुलगुरु, लखनऊ विद्यापीठ