जम्मू काश्मीरमधील आंदोलन सुरुच, मृतांचा आकडा 65 वर पोहोचला
By Admin | Published: August 16, 2016 12:15 PM2016-08-16T12:15:52+5:302016-08-16T12:37:26+5:30
काश्मीर खो-यात 9 जुलैपासून हिंसक वृत्तीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन पोलिसांचादेखील समावेश आहे.
>- ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 16 - दगडफेक करणा-या आंदोलकांवर जवानांनी केलेल्या कारवाईत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बडगम जिल्ह्यातील मागम परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामुळे काश्मीर खो-यातील मृतांचा आकडा आता 65 वर पोहोचला आहे. 'मागम परिसरातील काही तरुणांनी अचानकपणे सीआरपीएफ वाहनाच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली होती', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे.
'दगडफेक करण्यास सुरुवात झाल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. दरम्यान श्रीनगर जिल्हा आणि अनंतनाग शहरात कर्फ्यू सुरु असून काश्मीर खो-यातील जनजीवन सलग 39व्या दिवशी विस्कळीत आहे.
फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या संपामुळे शाळा, कॉलेज आणि खासगी कार्यालयदेखील बंद असून सार्वजनिक वाहतूकही ठप्प आहे. सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीदेखील अत्यंत कमी आहे. संपुर्ण खो-यात इंटरनेट आणि मोबाईल सेवादेखील ठप्प आहे.
हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीचा सुरक्षा जवानांनी 8 जुलै रोजी खात्मा केला होता. तेव्हापासून काश्मीर खो-यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. 9 जुलैपासून हिंसक वृत्तीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन पोलिसांचादेखील समावेश आहे.