ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचं कळत आहे. जसजशी वेळ सरकत आहे तसतसा तणाव वाढत चालला आहे.
आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे.
संबधित बातम्या -
भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली करणार हे माहित असल्याने सीमारेषेवरील सुरक्षा अगोदरच वाढवण्यात आली आहे. जवानांच्या सुट्टया रद्द करुन तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमारेषेवरील गावांनाही खाली केलं जात आहे. भारताच्या हल्यानंतर पाकिस्तान शांत बसणार नाही हे अपेक्षित होतं. आणि सीमेजवळ पाकिस्तान सैन्याचा स्पेशल अॅक्शन ग्रुप दिसला आहे. त्यामुळे पाकिस्तानने हालचाली सुरु केल्याचं दिसतं आहे.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने बुधवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.
काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या (आयबी) सहा जिल्ह्यांमधील दहा किमीच्या परिसरातील गावे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशातील सर्व नौदलाच्या हवाई दलाच्या तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर येथील सीमांवरील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर पंजाबच्या पाक सीमेवरील लोकांनी गावे सोडण्यास सुरुवात केली असून, त्यांची अन्यत्र राहण्याची सोय करण्यात येत आहे. काहींनी मात्र अन्य नातेवाईकांकडे आसरा घेण्याचे ठरवले आहे.
Web Title: Movement towards Pakistani army border after the attack of India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.