चित्रपट एका दिवसात १२० कोटी कमवतात; मग कसली मंदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:40 AM2019-10-13T05:40:49+5:302019-10-13T05:41:07+5:30
रवीशंकर प्रसाद यांचे अजब तर्कट
मुंबई : जगभरातील वित्तीय संस्था आणि अर्थशास्त्री मंदीच्या सावटाबाबत चिंता व्यक्त करत असताना, भाजपचे मंत्री मात्र चित्रपटांच्या कमाईचा दाखला देत मंदी नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. २ आॅक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानेच या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केल्याचा अजब दावा केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी केला.
नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. २ आॅक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असे प्रसाद म्हणाले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, गणेश हाके उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने आर्थिक आघाडीवर काळजी करण्यासारखी स्थिती नाही. देशात या वर्षी १६.३ बिलियन डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा थेट विदेशी गुंतवणुकीत २० टक्के वाढ झाली आहे.
चलनवाढीचा दर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. करदात्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे, आयकर संकलनातही दुपटीने वाढ झाली आहे. जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था ६ टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. मागील दोन वर्षांत कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (ईपीएफ) अडीच कोटींनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साडेपाच लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या, असे नॅसकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नव्या नोकºया निर्माण होत आहेत, म्हणूनच कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये वाढ होते आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.