चित्रपट, नाट्यगृहांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षकांना मुभा; केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:33 AM2021-01-28T02:33:31+5:302021-01-28T02:33:48+5:30
जलतरण तलाव सर्वांसाठी खुले, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : देशातील चित्रपटगृह, नाट्यगृह चालकांसाठी केंद्र सरकारने बुधवारी एक खूशखबर दिली. याआधीच चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली होती. आता यापेक्षा जास्त प्रेक्षकांना बसण्यास केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संमती दिली आहे.
कोरोना साथीच्या काळासाठी जारी केलेली ही नवी मार्गदर्शक तत्त्वे १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत लागू असतील. केंद्र सरकारने म्हटले आहे की, जलतरण तलाव राष्ट्रीय जलतरणपटूंना वापरण्यास याआधीच परवानगी देण्यात आली होती. पण आता हे जलतरण तलाव सर्वांच्या वापरासाठी खुले करण्यात येणार आहेत.
विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. नागरिकांनी राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावर किंवा मालवाहतुकीवर असलेले निर्बंध याआधीच हटविण्यात आले होते. अशा वाहतुकीसाठी विशेष परवानगीची गरज नाही, असे केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.
सर्व प्रकारच्या प्रदर्शनांना संमती
नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, आतापर्यंत व्यावसायिक प्रदर्शनांच्या आयोजनासाठीच संबंधित सभागृहांना परवानगी देण्यात आली होती. आता सर्व प्रकारच्या प्रदर्शनांच्या आयोजनास संमती देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंधांपैकी आणखी काही निर्बंध हटविण्याचा निर्णय केंद्रीय नागरी वाहतूक खाते गृहखात्याशी चर्चा करून घेऊ शकते.