खासदार दानिश यांचे पंतप्रधानांबद्दल अपशब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:10 AM2023-09-25T11:10:57+5:302023-09-25T11:11:23+5:30
भाजपचा आरोप; आरोप निराधार : दानिश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी २१ सप्टेंबर रोजी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. विरोधक एकवटले असून बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, दानिश अली यांनी पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
खासदार निशिकांत दुबे यांनी सभापतींना पत्र लिहून दानिश यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरल्याची तक्रार केली आहे. दानिश म्हणाले, ‘देशाच्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरण्याइतपत नीतिमत्ता ढासळली नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत, मी ते गांभीर्याने घेत नाही, असे म्हणाले.
रमेश बिधुरी यांचे मौन
भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. याबाबत रविवारी बिधुरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याप्रकरणी लक्ष घालतील, असे भाजप खासदाराने सांगितले.
दुबे यांचे पत्र
लोकसभा सभापतींना लिहिलेल्या पत्रात निशिकांत दुबे लिहितात, दानिश अली यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरले होते. कोणत्याही देशभक्त लोकप्रतिनिधीचा संयम सुटण्यासाठी हे पुरेसे आहे, असे मला वाटते. यामुळे रमेश बिधुरी यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले.