मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणतात, पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 08:54 AM2018-04-24T08:54:36+5:302018-04-24T08:54:36+5:30
देशामध्ये बलात्काराच्या व लैंगिक शोषणाच्या घटना वाढण्यामागे पॉर्न साइट्स हे महत्त्वाचं कारण असल्याचं वक्तव्य मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केलं आहे.
नवी दिल्ली- देशामध्ये बलात्काराच्या व लैंगिक शोषणाच्या घटना वाढण्यामागे पॉर्न साइट्स हे महत्त्वाचं कारण असल्याचं आम्हाला वाटतं, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केलं आहे. मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार पॉर्नसाइट्स अगदी सहजपणे वापरता येतात, त्यामुळे बलात्काराचे गुन्हे घटना वाढत असल्याचं आढळून आलं, असाही दावाही त्यांनी केला आहे. मध्यप्रदेशमध्ये पॉर्नसाइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी आम्ही केंद्राला विचारणा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आम्ही अशा 25 वेबसाइट्सची माहिती निवडल्या आहेत व त्यावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे, असं भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं. देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांवर लोकांनी तीव्र शब्दात टीका करत निषेध नोंदवला, लोकांच्या उद्रेकानंतर भूपेंद्र सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
We think the reason for rising number of child rape and molestation cases is porn. We are contemplating banning porn in Madhya Pradesh, will approach Centre in the matter: Bhupendra Singh, Madhya Pradesh Home Minister pic.twitter.com/sTpHIkGq5I
— ANI (@ANI) April 24, 2018
इंदूरमध्ये गेल्या आठवड्यात एका सहा महिन्याच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्या चिमुरडीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं. सुनिल भील (वय 21) असं आरोपीचं नाव असून पीडित मुलीला उचलून घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. पीडित चिमुरडीच्या आईशी भांडण झाल्याने त्याने मुलीचं अपहरण करून हे कृत्य केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली गेली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 92 टक्के प्रकरणात, अल्पवयीन मुलींवर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून बलात्कार होतात, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. इंदूरच्या घटनेने मला मोठा धक्का बसला आहे. एखाद्या लहान मुलीबरोबर कुणी असं कृत्य कसं करू शकतं? याघटनेवर प्रशासनाने पावलं उचलत आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होइल याकडे आम्ही लक्ष देऊ, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.