"तुम्ही सेलिब्रिटी असल्याची पर्वा नाही"; अध्यक्षांवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, "आम्ही इथे काय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 02:00 PM2024-08-09T14:00:05+5:302024-08-09T14:05:04+5:30
राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी खरपट्टी काढल्यानंतर खासदार जया बच्चन यांनी रोष व्यक्त केला.
Jaya Bachchan-Jagdeep Dhankar: खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत जोरदार वादावादी झाली. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखर यांच्या बोलण्याच्या स्तरावरुन प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केल्यानंतर जया बच्चन संतापल्या. मला तुमच्या बोलण्याचा टोन हा योग्य वाटला नाही असं म्हणत जया बच्चन यांनी आक्षेप घेतला. यावर संतप्त झालेल्या धनखड यांनी जया बच्चन यांची खरडपट्टी काढली. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय, असे धनखड यांनी सुनावलं. त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाच्या बाहेर पडत याप्रकरणावर भाष्य केलं.
पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र जया बच्चन यांच्याबाबत राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. याआधी अध्यक्ष धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे म्हटल्याने हा वाद सुरु झाला होता. माझी स्वत:ची ओळख असताना माझ्या पतीचे नाव घेतले जाऊ नये, असे जया बच्चन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
जया बच्चन यांची राज्यसभेत बोलण्याची पाळी आली तेव्हा सभापतींनी त्यांचे नाव पुकारले गेले. यावर जया बच्चन यांनी अध्यक्ष धनखड यांच्यावर आरोप केला. "मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन समजते. मला माफ करा सर, पण तुमच्या बोलण्याचा टोन मला मान्य नाही. तुम्ही खुर्चीवर असलात तरी आम्हीसुद्धा सहकारी आहोत," असे जया बच्चन म्हणाल्या.
त्यानंतर जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं. "जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हा असा प्रकार नकोय. मी येथून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय. आता बास झालं. तुम्ही भलेही सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही," अशा शब्दात धनखड यांनी सुनावलं.
त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाबाहेर येत याप्रकरणी भाष्य केलं. "ते काय आम्हाला जेवायला घालत नाही. मी अध्यक्षांच्या टोनवर आक्षेप घेतला. आम्ही सगळे काय शाळकरी मुलं नाहीत. आम्ही सर्व ज्येष्ठ आहोत. विशेषत: जेव्हा विरोधी पक्षनेते (मल्लिकार्जुन खर्गे) बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी माईक बंद केला. तुम्ही हे कसे करू शकता? हे परंपरेच्या विरोधात आहे. त्यांना बोलू दिले नाही तर आम्ही इथे काय करायला आलो आहोत? ते नेहमी असंसदीय शब्द वापरतात. ते म्हणाले की, तुम्ही सेलिब्रिटी आहात याची मला पर्वा नाही. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे आता मला माफी हवी आहे," असे जया बच्चन यांनी स्पष्ट केलं.