Kapil Sibal: “धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्याचे भारत उत्तम उदाहरण”: कपिल सिब्बल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 03:28 PM2022-09-24T15:28:31+5:302022-09-24T15:29:25+5:30
Kapil Sibal: विरोधी पक्षातील नेते सतत सीबीआय, ईडी आणि पोलिसांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, असे सांगत कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीका केली.
Kapil Sibal: आताच्या घडीला राज्यासह देशपातळीवर विविध मुद्द्यांवरून सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यातही केंद्रीय तपास यंत्रणांचे नेते, लोकप्रतिनिधींवर पडणारे छापे यांवरूनही विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यातच काँग्रेसचे माजी नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्यात येत आहे. भारत हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. अशी घणाघाती टीका कपिल सिब्बल यांनी केली आहे.
कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली. गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील, तर तो न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात येऊ शकत नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. दुसरीकडे, देशातील बहुसंख्य जनता घाबरलेली आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत. समाजात पसरत असलेल्या द्वेषाबाबत काय करायचे? यावरचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, असा कपिल सिब्बल म्हणाले.
विरोधीपक्षातील नेते भीतीच्या सावटाखाली जगत आहेत
भारतात सध्या ज्या पद्धतीने द्वेषाचे राजकारण केले जात आहे, ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून केले जात आहे. संबंधित लोकांवर पोलिसांकडूनही काहीही केली जात नाही. जे द्वेषपूर्ण भाषणे देतात त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने अशा लोकांना पुन्हा द्वेषपूर्ण भाषणे करायला प्रोत्साहन मिळत आहे, असे सांगत आम्हीही सतत भीतीमध्ये जगतो. आम्हाला ईडीची भीती वाटते, आम्हाला सीबीआयची भीती वाटते, आम्हाला सरकारची भीती वाटते, आम्हाला पोलिसांची भीती वाटते, आम्हाला प्रत्येकाची भीती वाटते. आमचा आता कोणावरही भरवसा राहिलेला नाही, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.