Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: “प्रभू श्रीरामांनी सत्याचा मार्ग अवलंबला, पण पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:07 PM2023-04-10T14:07:25+5:302023-04-10T14:08:54+5:30
Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीका केली आहे.
Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यावर जात रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्री अयोध्येला गेले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडत आहेत.
ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेते शिंदे गटावर टीका करत आहेत. जे रामलल्ला यांच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत त्यांनी भक्त म्हणून दर्शन घ्यावे, राजकीय पर्यटक म्हणून जाऊ नये. या पवित्र ठिकाणाचा राजकारणासाठी वापर होताना पाहून वाईट वाटले. असे असले तरी ते केवळ ‘गद्दार’ आहेत, दुसरे काहीही नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.
पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत
तसेच कपिल सिब्बल यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. प्रभू श्रीराम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्याग केला. बाळासाहेब ठाकरेंनीही हे गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला.
दरम्यान, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सर्वांत आधी एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. हे सामायिक व्यासपीठ आपण नव्याने स्थापन केलेला ‘इन्साफ’ हा मंचही असू शकतो, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"