चुकून जरी कोणी गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले तर...; ठाकरे गटाच्या नेत्याची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:55 PM2023-08-30T16:55:04+5:302023-08-30T16:57:12+5:30
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला.
Priyanka Chaturvedi on INDIA alliance : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून I-N-D-I-A या आघाडीची स्थापना केली आहे. पण, आता या आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर वाद चिघळल्याचे दिसते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली, त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. मात्र, यावर पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
प्रियंका चतुर्वेदींनी मांडली बाजू
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला. त्या म्हणाल्या की, 'आप' नेत्यांचे हे काही प्रमाणात म्हणणे योग्य आहे. कारण जर कोणी मला विचारले की पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा, तर मी म्हणेन की उद्धव ठाकरे आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत.
भाजपावर टीकास्त्र
प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करताना म्हटले, "एका बाजूला आम्ही आहोत आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आहे, त्यातील सगळेच घाबरलेले आहेत. तिथे प्रत्येकजण फक्त एकच नाव घेऊ शकतो. चुकून जर कोणी नितीन गडकरींचे नाव घेतले तर त्याचे करिअर संपेल."
#WATCH | Shiv Sena (UBT) leader Priyanka Chaturvedi says, "It is fine...If someone asks me, I will say Uddhav Thackeray should be the one (PM candidate of INDIA alliance). On hand, there is the BJP that, out of fear, can take just one name. If Nitin Gadkari's name comes forth… https://t.co/C5WBzzWUUkpic.twitter.com/YfYTPcvEDB
— ANI (@ANI) August 30, 2023
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी मात्र 'आप' नेत्यांच्या विधानावर वेगळी भूमिका मांडली. चढ्ढा यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे वक्तव्य फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की आमचा पक्ष पंतप्रधानपदासाठी 'इंडिया' आघाडीत सामील झालेला नाही. अरविंद केजरीवाल हे भारताचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नाहीत. भारताला चांगले बनवण्यासाठी आम्ही भाजपाच्या विरोधात आलो आहोत.