पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:50 AM2024-07-25T11:50:53+5:302024-07-25T11:52:43+5:30

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे.

mp seoni amir khan three idiots style delivery doctor live over phone | पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती

फोटो - आजतक

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. मंगळवारी जोरावाडी गावात राहणाऱ्या महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. सततच्या पावसामुळे गावाजवळील नाला तुडुंब भरला होता. त्यामुळे रुग्णवाहिका महिलेपर्यंत पोहोचू शकली नाही. तातडीने ही माहिती शासकीय रुग्णालयाच्या डॉ. मनिषा सिरसाम यांना देण्यात आली.

डॉ. सिरसाम यांनी आशा वर्करशी बोलल्यानंतर गावातील प्रशिक्षित सुईणीशी संपर्क साधून तिला महिलेच्या घरी पाठवलं. यानंतर डॉ.मनिषा यांनी सुईणीला फोनवरून प्रसूतीची माहिती देत ​​महिलेची सुखरूप प्रसूती करून घेतली. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला, नाल्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महिलेला आणि दोन्ही मुलांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आणि तिची दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहेत.

डॉ.मनिषा सिरसाम यांनी सांगितलं की, रवीना या महिलेला अचानक वेदना होऊ लागल्या आणि पूर आल्याने महिलेला घेण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. त्यानंतर आशा वर्करशी बोलल्यानंतर गावातील रेशना वंशकर यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. 

मी रेशनाला फोनवर प्रसूतीबाबत सांगत राहिले, त्यानंतर महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या अनोख्या डिलिव्हरीबद्दल जाणून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महिला आणि तिचं कुटुंब खूप आनंदी आहे. काही दिवसात महिलेला तिच्या घरी पाठवलं जाईल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

Web Title: mp seoni amir khan three idiots style delivery doctor live over phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.