...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:05 PM2023-08-08T17:05:10+5:302023-08-08T17:05:46+5:30
श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर तर हल्ला चढवलाच. पण महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तसेच हिंदूत्वावर बोलताना लोकसभेतच हनुमान चालिसाही म्हणून दाखवली.
यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे काम केले -
श्रीकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, यांना वाटायला लागले, आपणच मुख्यमंत्री व्हावे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्वाच्या विचारांना कोण विचारतं. यांनी हिंदूत्वाचे विचार विकण्याचे आणि बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणत होते, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. एवढेच नाही, तर निवडणुकीत आपण एकमेकांना शिव्या देता आणि निवडणुकीनंतर आघाड्या करता, जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार? असेही बाळासाहेब म्हणत होते. यांनीही असेच केले निवडणूक एकासोबत लढली आणि निवडून आल्यानंतर खुर्चीसाठी सर्व विचार बाजूला करून अनैतिक सरकार स्थापन केले."
"येथे कधी कुणीविचार केला नव्हता, की काँग्रेस सोबत शिवसेनेची आघाडी होईल. लोकांनीही कधी हा विचार केला नव्हता. मात्र लोकांसोबत मतदारांसोबत ज्यांनी ते सरकार बनवले त्यांनी गद्दारी केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले. ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवल्या त्या समाजवादी सोबतही यांनी आघाडी केली," अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठकरेंवर केली.
हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती -
श्रीकांत शिंदे म्हणाले, "हणूमान चालिसा म्हणण्यावरही महाराष्ट्रात बंदी होती. मला संपूर्ण हणूमान चालिसा येते, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी थेट लोकसभेतच हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. तसेच, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदूत्वार चालणारे लोक आहोत. ज्यांना हनुमान चालिसा म्हणायची होती त्यांना कारागृहात टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देश द्रोहाचा आरोप लावण्यात आला होता, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले."