जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:24 PM2024-06-08T16:24:54+5:302024-06-08T16:28:36+5:30
एका भावा-बहिणीच्या जोडीने मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) च्या राज्य सेवा परीक्षा 2021 मध्ये चांगली रँक मिळवली आहे.
प्रबळ इच्छाशक्ती असली की अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. एका भावा-बहिणीच्या जोडीने मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) च्या राज्य सेवा परीक्षा 2021 मध्ये चांगली रँक मिळवली आहे. तसेच या दोघांचीही उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. MPPSC ने शुक्रवारी राज्य सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला.
MPPSC PCS परीक्षेत अर्जुन सिंह ठाकूरला 21 वा तर राजनंदनी सिंह ठाकूरला 14 वा रँक मिळाला आहे. दोघांनीही प्राथमिक शिक्षण उज्जैन येथील एका शाळेत घेतलं. येथून बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी भोपाळ येथून इंजिनीअरिंगही केलं. त्यांचे वडील डॉ. वाय.एस. ठाकूर हे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत.
राजनंदनीची 2020 मध्ये नायब तहसीलदार पदासाठी निवड झाली होती, सध्या ती सिहोर येथे तैनात आहे. राजनंदनी म्हणाली की, नोकरी करत असताना तिने अभ्यासासाठी वेळ काढला. काही साध्य करायचं असेल तर वेळ असो वा नसो, अभ्यासात स्वत:ला झोकून दिलं पाहिजे, तरच ध्येय गाठले जाईल, असा तिचा विश्वास आहे. नोकरीत असूनही तिने पुढील तयारीसाठी वेळ काढला आणि आज उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली.
इंजिनीअरिंगनंतर अर्जुनला टीसीएसमध्ये नोकरी मिळाली, पण तो रुजू झाला नाही. पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी होण्याचे त्याचं ध्येय होतं. त्यामुळे त्याने देखील तयारी सुरूच ठेवली असून आज त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. रोज आठ ते दहा तास अभ्यास आणि फक्त सोशल मीडियावरील बातम्या आणि कंटेंट पाहण्यासाठी मोबाईल वापरत असल्याचंही अर्जुनने सांगितलं.
2018 पासून अर्जुन आपलं सर्वोत्तम देण्यासाठी सतत मेहनत घेत आहे. ज्याचं फळ आता त्याला मिळालं आहे. भाऊ आणि बहीण दोघांनी मिळून एमपीपीएससीची तयारी केली आणि यशही मिळविलं. छोट्या-छोट्या अपयशाने निराश होणाऱ्या मुलांसाठीही हे यश प्रेरणा देणारं आहे. उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्याने ठाकूर परिवारात आनंदाचं वातावरण आहे.