माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पश्चिम महाराष्ट्रातील ५५ सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत
By Appasaheb.patil | Published: March 24, 2023 03:23 PM2023-03-24T15:23:51+5:302023-03-24T15:24:25+5:30
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली
नवी दिल्ली - माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडे नाईक - निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली. यावर मोदी यांनी सकारात्मकता दाखवित लवकरच मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिल्याची माहिती नाईक-निंबाळकरांनी दिली.
यावेळी दिलेल्या निवेदन व चर्चा मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ,तेलंगाना, या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार ,सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करावा, त्यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रकल्प मार्गे लावावा यासाठी विशेष योजना तयार करून या ५५ दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत. हे दुष्काळी तालुके परंपरागत दुष्काळी म्हणूनच आजही गणले जातात त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने निरा देवधर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे हे सांगितले . या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी ही मागणी केली.
याचवेळी मतदारसंघातील उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत, फलटण- पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून हे ही काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना दयावेत अशी ही विनंती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक यावर विचार होऊन लवकरच हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.