मोदींच्या घरासमोर आंदोलन करणारे खासदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:00 AM2018-04-09T02:00:03+5:302018-04-09T02:00:03+5:30
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानासमोर रविवारी निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात, लोककल्याण
मार्ग येथील निवासस्थानासमोर रविवारी निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तेलुगु देसम पार्टीच्या खासदारांना तुघलक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. या खासदारांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.
मागणी नेमकी काय?
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तेलुगु देसम पार्टी तसेच वायएसआर काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांच्या निवासस्थानी तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांची बैठक झाली व त्यात निदर्शने करण्याचा निर्णय झाला. खासदार जयदेव गल्ला यांनी म्हटले आहे की, राज्याला विशेष दर्जा देण्याचा पंतप्रधानांना अधिकार आहे. आंध्र प्रदेशला तसा दर्जा देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्याची पूर्तता व्हायला हवी. त्यासाठीच आम्ही निदर्शने करण्याचे ठरविले.