मांझींनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
By admin | Published: May 29, 2015 12:06 AM2015-05-29T00:06:48+5:302015-05-29T00:06:48+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी गुरुवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी गुरुवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. वर्षअखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मांझी भाजपसोबत युती करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे; परंतु खुद्द मांझी मात्र या मुद्यावर मौन बाळगून आहेत.
निवडणुकीपूर्वी कुठल्या पक्षासोबत युती करणार या संदर्भात प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळतानाच या महादलित नेत्याने निवडणुकीनंतर मात्र राजकीय आघाडीत सहभागी होण्यास सहमती दर्शविली; परंतु जेडीयुसोबत आपण जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मांझींवर नजर
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव या दोघांचीही मांझींवर नजर आहे. कारण मांझी हे महादलित नेते असून राज्यातील राजकारणात या समुदायाला फार महत्त्व आहे. लालूप्रसाद यांनी अलीकडेच मांझी यांना जनता परिवारात सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला होता; परंतु नितीशकुमार यांनी त्यावर आक्षेप घेतला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी मांझी यांच्यासोबत हातमिळवणीचे संकेत देताना चर्चा सुरू असून नव्या मित्रपक्षांसाठी भाजपचे द्वार खुले असल्याचे म्हटले होते.