जेईई-ॲडव्हान्स परीक्षेत जयपूरचा मृदूल अग्रवाल अव्वलस्थानी, ४१ हजार उत्तीर्ण; मुंबईच्या Karthik Nairला सातवा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:00 AM2021-10-16T09:00:47+5:302021-10-16T09:01:31+5:30
JEE-Advance Exam Result: देशभरात २३ आयआयटीतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई - ॲडव्हान्स या परीक्षेत यंदाच्या वर्षी जयपूर येथील मृदूल अग्रवाल (१८ वर्षे) याने प्रथम तर मुंबईतील कार्तिक नायर याने सातवा क्रमांक पटकाविला आहे.
नवी दिल्ली : देशभरात २३ आयआयटीतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई - ॲडव्हान्स या परीक्षेत यंदाच्या वर्षी जयपूर येथील मृदूल अग्रवाल (१८ वर्षे) याने प्रथम तर मुंबईतील कार्तिक नायर याने सातवा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत यंदा ४१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मृदूल अग्रवाल याला ३६० पैकी ३४८ गुण मिळाले असून, तो जेईई-ॲडव्हान्स परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी ठरला आहे. तर मुलींमध्ये काव्या चोप्रा ही पहिली आली आहे.
या परीक्षेत ४१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यासंदर्भात आयआयटीने एका निवेदनात म्हटले आहे की, यंदा जेईई-ॲडव्हान्स परीक्षेत ४१,८६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ६,४५२ मुलींचा समावेश आहे. दिल्लीच्या काव्या चोप्रा हिने परीक्षार्थी मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला असून, तिला ३६० पैकी २८६ गुण मिळाले. या परीक्षेला बसण्यासाठी १ लाख ५१ हजार १९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ४१ हजार ६९९ जणांनी यंदा जेईई - ॲडव्हान्स परीक्षा दिली होती. त्यात १,०९,४१४ मुले व ३२,२८५ मुलींचा समावेश होता.गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई हे मृदूलचे आदर्श आहेत.