धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो; वरिष्ठ नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 07:39 AM2019-07-13T07:39:49+5:302019-07-13T07:48:48+5:30
झारखंडमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाची 'फिल्डींग'
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राजकीय खेळपट्टीवर दिसण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतर धोनी भाजपामध्ये प्रवेश करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं यावर भाष्य केलं आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. यानंतर धोनीवर बरीच टीका असून त्याच्या राजीनाम्याची चर्चादेखील जोरात सुरू आहे.
धोनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते संजय पासवान यांनी बोलून दाखवली. 'याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र धोनीनं निवृत्ती स्वीकारल्यानंतरच याविषयी निर्णय होईल,' असं पासवान म्हणाले. मी धोनीला जवळून ओळखतो. तो जगप्रसिद्ध खेळाडू असून त्याला पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पासवान यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाकडून 'संपर्क फॉर समर्थन' अभियान सुरू होतं. त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी धोनीची भेट घेतली होती. या वर्षाच्या अखेरीस झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी धोनीनं निवृत्ती स्वीकारल्यास त्याला भाजपामध्ये आणण्यासाठी 'फिल्डींग' लावण्यात आली आहे. धोनीला थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचा विचार भाजपाकडून सुरू आहे.