हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 07:03 PM2022-10-08T19:03:50+5:302022-10-08T19:49:15+5:30
honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
जयपूर : गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एमटीएस रवी प्रकाश मीणा याला अटक केली आहे. आरोपी रवी प्रकाश मीणा हनीट्रॅपमध्ये अडकून देशाची सामरिक माहिती पाकिस्तानी हस्तकांना देत होता. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी सुरक्षा यंत्रणा एकवटल्या आहेत.
पोलीस गुप्तचर विभागाचे डीजी महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थांकडून सुरू असलेल्या हेरगिरीच्या कारवायांवर सतत सीआयडी इंटेलिजन्स लक्ष ठेवून होते. यादरम्यान, करौली येथील रहिवासी असलेला एमटीएस रवी प्रकाश मीना हा दिल्लीतील लष्करी भवनात तैनात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली.
सीआयडीच्या गुप्तचर पथकांनी आरोपी रवी प्रकाश मीणा याच्यावर नजर ठेवली असता, हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर रवी प्रकाश मीणा हा पाकिस्तानच्या महिला एजंटच्या संपर्कात असल्याचे समोर आले. महिला एजंटच्या सांगण्यावरून पाकिस्तानी एजंटला रवी प्रकाश मीणा सामरिक महत्त्वाची माहिती पाठवत होता. त्यामुळे सीआयडी इंटेलिजन्स, मिलिटरी इंटेलिजन्स, सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो आणि सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त चौकशी केली.
चौकशीदरम्यान असे समोर आले की, आरोपी रवी प्रकाश मीना हा फेसबुकच्या माध्यमातून महिला पाकिस्तान एजंटच्या संपर्कात आला. पाकिस्तानी महिला एजंटने स्वत:ची ओळख पश्चिम बंगालमधील रहिवासी अंजली तिवारी अशी करून दिली होती. लष्करात कार्यरत असल्याचा दावा करत महिलेने रवी प्रकाश मीणा याला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि सोशल मीडियावर माहिती मिळवली.
तसेच, अनेक वेळा माहिती देण्याच्या बदल्यात रवी प्रकाश मीणा याच्या बँक खात्यात पैसेही जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.