Mucormycosis : इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे वाढला ब्लॅक फंगसचा फैलाव, एम्सच्या ज्येष्ठ डॉक्टराचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:36 PM2021-05-21T20:36:30+5:302021-05-21T20:37:49+5:30
Mucormycosis: ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.
नवी दिल्ली - एकीकडे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले असतानाच संपूर्ण देशामधून ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस)चे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. मात्र आता एम्समधील एका ज्येष्ठ महिला डॉक्टरांनी ब्लॅक फंगसच्या फैलावाबाबत धक्कादायक कारण सांगितले आहे. ( Industrial Oxygen Increases Black Fungus Outbreak, Shocking Claim by Senior AIIMS Doctor Uma Kumar)
सुरुवातीला ब्लॅक फंगसचे मुख्य कारण हे स्टेरॉइडचा वापर असल्याचे सांगण्यात येत होते. पण दिल्लीच्या एम्समधील डॉक्टर उमा कुमार यांनी हा आजार पसरण्यामागे इतरही अनेक कारणे असल्याचे सांगितले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडस्ट्रियल ऑक्सिजन दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच ह्युमिडिफायरमध्ये स्टेरायल वॉटरऐवजी अस्वच्छ पाणी वापरले जात आहे. त्याशिवाय न धुतलेले अस्वच्छ मास्कचा वापर केला जात आहे. तसेच स्टेरॉइडचा चुकीचा वापरसुद्धा ब्लॅक फंगसच्या फैलावामागचे मोठे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.