Mucormycosis: म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:30 AM2021-05-25T08:30:48+5:302021-05-25T08:31:09+5:30
Mucormycosis: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची सुचिन्हे दिसू लागलेली असतानाच आता काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी काळ्या बुरशीबाबत सोमवारी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, ‘शरीराच्या विविध भागांत पसरू शकणाऱ्या या बुरशीचा रंग वेगवेगळा आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा आजार पटकन होत असल्याचे दिसून आले आहे. साधारणत: श्वासनलिका, नाक आणि डोळ्यांभोवतालची हाडे यांमध्ये ही बुरशी होते आणि त्याचा मेंदूपर्यंत प्रसार होऊ शकतो. फुप्फुसांतही ही बुरशी आढळू शकते; परंतु शरीराच्या वेगवेगळ्या भागांत होऊ शकणाऱ्या या बुरशीला तिच्या रंगावरून वेगवेगळी नावे देण्यात काही अर्थ नाही. हा आजार संसर्गजन्य नसून त्यावर उपचार करता येतात, हे महत्त्वाचे आहे.’