कुत्र्याची उपमा दिल्याने व्ही. के. सिंग अडचणीत

By admin | Published: October 23, 2015 04:07 AM2015-10-23T04:07:43+5:302015-10-23T04:07:43+5:30

फरिदाबाद जिल्ह्याच्या सोनपेढ गावात एका दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेस

The mug of the dog Of The trouble of singing | कुत्र्याची उपमा दिल्याने व्ही. के. सिंग अडचणीत

कुत्र्याची उपमा दिल्याने व्ही. के. सिंग अडचणीत

Next

गाझियाबाद/ नवी दिल्ली : फरिदाबाद जिल्ह्याच्या सोनपेढ गावात एका दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेस ‘एखाद्या कुत्र्यावर कोणीतरी दगड मारण्याची’ उपमा दिलेले केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग गुरुवारी अडचणीत आले. विरोधी पक्षांनी सिंग यांच्यावर टीकेची झोड उठविली आणि त्यांचे हे वक्तव्य एकूणच मोदी सरकारची मानसिकता व्यक्त करणारे आहे, असा आरोप करून सिंग यांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली.
गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथे मोहम्मद इकलाख या मुस्लिमास जिवंत जाळले जाणे किंवा आता सोनपेढ येथील दलित जळीत कांड या घटना हा राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय आहे व त्यावरून केंद्र सरकारला दोष देता येणार नाही, असा बचाव केंद्रातील मंत्री व भाजपाचे नेते करीत आहेत. केंद्रात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्ही. के. सिंग गाझियाबादचे खासदार आहेत. गुरुवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गाझियाबाद येथे आले असता वृत्तवाहिन्यांनी सोनपेढ घटनेबद्दल विचारले असता त्यांनीही आपल्या सहकारी मंत्री आणि पक्षनेत्यांप्रमाणेच बचाव केला.
मात्र हे करीत असताना त्यांनी ‘कोणीतरी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार का?’ असे विचारल्याने काहूर माजले. वृत्तवाहिन्यांवर जनरल व्ही.के. सिंग यांचे जे वक्तव्य प्रसारित झाले त्यानुसार ते म्हणाले, ‘हे पाहा, मुद्दा असा आहे की स्थानिक घटनांचा केंद्र सरकारशी संबंध लावू नका. चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्या कुटुंबामध्ये आधीपासूनच वाद सुरू होता... स्थानिक प्रशासन अपयशी ठरले असे (चौकशीतून) दिसले तर केंद्र सरकारचा संबंध येईल... प्रत्येक गोष्टीसाठी... एखाद्याने कुत्र्यावर दगड मारला तरी.. (केंद्र) सरकारला जबाबदार धरायचे, असे चालत नाही....’
वृत्तवाहिन्यांनी सिंग यांचे हे वक्तव्य पुन्हापुन्हा प्रसारित केल्याने आणि त्यावरून विरोधक तुटून पडल्याने दुपारनंतर जनरल सिंग यांनी टिष्ट्वटरवरून खुलासेवजा सारवासारव केली. टिष्ट्वटरवर त्यांनी लिहिले की, ‘मी ते विधान उपमा देण्याच्या उद्देशाने केले नव्हते. मी व माझे जवान जात, पात वा धर्माचा विचार न करता देशासाठी प्राण पणाला लावत असतो. या महान देशाचे नागरिक या नात्याने आम्ही संवेदनशील व तेवढेच जबाबदारही आहोत. कोणत्याही ठरावीक प्रदेश वा व्यक्तीपेक्षा देशाचा अजेंडा मोठा आहे.’ सिंग यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वतीने देशाची माफी मागावी आणि सिंग यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला जावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी सिंग यांचा राजीनामा आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या मागणीखेरीज सोनपेढ घटनेच्या तपासावर प्रभाव टाकण्याचाही त्यांच्यावर आरोप केला.

सिंग यांना हाकला
सिंग यांचे वक्तव्य लज्जास्पद आहे व त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला भरला जावा, अशी मागणी करत आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘आज दसरा आहे. वाईटावर व अहंकारावर चांगल्याच्या विजयाचा हा दिवस. मोदीजींना याच भावनेने दसरा साजरा करायचा असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातून अहंकाराला हद्दपार करावे. त्यांनी आजचा दिवस मावळण्याच्या आत व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे.

कोणीतरी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार का?
- व्ही. के. सिंग

दोन लहान मुलांना जिवंत जाळले जाण्याची तुलना कुत्र्याला दगड मारण्याशी करणे याहून अधिक विवेकशून्य व अधमपणाचे दुसरे काही असू शकत नाही.
- मनीष तिवारी, नेते, काँग्रेस

सिंग यांचे विधान अमानुष, निषेधार्ह व धक्कादायक आहे. हा केवळ दलितांचाच नव्हे, तर सर्वच भारतीयांचा अपमान आहे.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ता, काँग्रेस

हा जातीयवादी उद्दामपणा आहे. मोदींनीही याआधी अन्य एका समाजाबद्दल अशीच उपमा दिली होती. पण आता पंतप्रधान झाल्याने ते आपल्या पूर्वग्रहातून बाहेर येतील व सिंग यांच्यावर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
- वृंदा करात, सदस्य,
पॉलिट ब्युरो, मार्क्सवादी कम्युनिस्ट

Web Title: The mug of the dog Of The trouble of singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.