मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 09:55 PM2023-06-25T21:55:48+5:302023-06-25T21:57:52+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले.
आम्ही कुठल्याही परिस्थितीत संस्कृतीवरील हल्ला खपवून घेणार नाही. आम्ही आधीच मोगल आणि इंग्रजांची गुलामगिरी भोगली आहे. मात्र जेव्हा आमच्या संस्कृतीवर हल्ला झाला, तेव्हा 1857 च्या क्रांतीच्या रुपाने आम्ही उत्तर दिले. जोवर मोगल मंदिरांमध्ये शिरले नाही, तोवर राज्य करत राहिले. मात्र जेव्हा मंदिरांमध्ये शिरले, तर आज त्यांचे वंशज रिक्षा चालवत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. ते रविवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया कार्यक्रमात बोलत होते.
योगी म्हणाले, अशा धर्मांतरणाचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. मात्र आता असे होणार नाहीत. शोषितांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आवश्यक आहे. त्यांना समजावून सांगावे लागेल, त्यांना आपल्या प्राचीन संस्कृतीची आठवण करून द्यावी लागेल. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी सन्मानित करण्यात आलेल्या संस्कृती योद्ध्यांनाही शुभेच्छा दिल्या.
योगी आदित्यनाथ म्हणाले, 48 वर्षांपूर्वी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला गेला. जर ते त्या वेळी यशस्वी झाले असते, तर आज आपण असे कार्यक्रम करू शकलो असतो का? असा सवाल करत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही काही नियम असतील.
सीएम योगी म्हणाले, जगातील सर्व देशांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. फ्रान्स कलेसाठी प्रसिद्ध आहे, तर ब्रिटनचीही आपली एक वेगळी ओळख आहे. याच पद्धतीने भारताचीही आपली एक वेगळी ओळख आहे. मोगल आणि इंग्रजांची गुलामगिरी आपण भोगली आहे. मात्र आपल्या संस्कृतीवर आक्रमण होताच आपण 1857 च्या क्रांतीच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या काडतुसांना विरोध केला. पुढे जाऊन वीर सावरकरांनीही याला मान्यता दिली. यावेळी योगी स्पष्ट शब्दात संदेश देताना म्हणाले, आमच्या संस्कृतीशी आणि आमची श्रद्धा यांच्यासोबत छेडछाड कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाऊ शकत नाही.