भारीच! लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं; छोट्या बहिणीने कष्ट करून मोठ्या बहिणीला केलं अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 03:11 PM2023-12-06T15:11:41+5:302023-12-06T15:20:18+5:30
निकिता लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती, इथे तिच्या धाकट्या बहिणीने तिला अभ्यासात पूर्ण पाठिंबा दिला.
एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर अशक्य गोष्टी देखील सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. निकिता साह हिने खूप मेहनत करून एपीओ (Assistant Prosecution Officer) परीक्षा उत्तीर्ण केली. निकिताच्या यशाचा संपूर्ण शहराला अभिमान आहे. निकिता चार वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झालं.
अशा परिस्थितीत तिच्या आईने कष्ट करून सात मुलींचं संगोपन केलं. सात मुलींमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेल्या निकिताचे प्राथमिक शिक्षण शहरातील नरायपूर येथे झाले. यानंतर निकिताने मुझफ्फरपूरच्या एसकेजे लॉ कॉलेजमधून पाच वर्षांचे बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. धाकटी बहीण विभा आणि भाचा दीपक यांच्या मदतीने ती न्यायालयीन परीक्षेच्या तयारीसाठी अलाहाबादला पोहोचली.
निकिता लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती, इथे तिच्या धाकट्या बहिणीने तिला अभ्यासात पूर्ण पाठिंबा दिला. निकिताने आपल्या लहान बहिणीच्या मदतीने परीक्षेच्या तयारीचा खर्च उचलला. सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 2023 मध्ये निकिताने BPSC द्वारे घेतलेली APO परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने निश्चित वेळापत्रक बनवून अभ्यासाची तयारी केली.
यश संपादन केल्यानंतर निकिताने आपल्या यशाचे श्रेय तिची आई, धाकटी बहीण विभा, दीपक आणि तिच्या सर्व बहिणींना दिलं आहे. आपली धाकटी बहीण विभा आणि दीपक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ती म्हणाली की, या दोघांच्या अथक परिश्रमामुळे मी आज या पदापर्यंत पोहोचली आहे. माझ्या लहान बहिणीने आणि आईने ज्या प्रकारे जबाबदारी पार पाडली त्यामुळेच आज मी हे यश मिळवू शकले आहे.