मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी
By admin | Published: July 6, 2017 02:11 AM2017-07-06T02:11:35+5:302017-07-06T02:11:35+5:30
सिक्किम परिसरातील आपले सैनिक भारताने स्वत:हून मागे घ्यावेत, अन्यथा १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, अशी धमकी चीनच्या
बीजिंग/नवी दिल्ली : सिक्किम परिसरातील आपले सैनिक भारताने स्वत:हून मागे घ्यावेत, अन्यथा १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे.
तर उद्दामपणे वागणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताबरोबरच अमेरिका व जपान मलबार कवायतीमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय चीनच्या हिंदी महासागरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीसॅट ७ म्हणजेच रुक्मिणी हा उपग्रह सज्ज आहे.
भूतान व सिक्किमच्या भागात आम्ही घुसखोरी केली नसून, आमचे सैन्य आमच्याच भागात आहे आणि तिथे रस्तेबांधणीचे काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असा दावा करीत चीनने भारतावरच घुसखोरीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर ते सैन्य हटवण्यात यावे, अन्यथा भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट केली जाईल, अशी इशारेवजा धमकी चीनने दिली आहे.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ चा भारत आणि १९६२ ची परिस्थिती वेगळी होती, असे केलेले विधान चीनला खूपच झोंबले दिसत आहे. त्यातूनच चिनी वृत्तपत्रातून ही धमकी दिल्याचे मानले जात आहे. युद्ध झाल्याश भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
मोठा युद्धसराव, भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती
चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींमुळे भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती मलबार कवायती या नावाने सुरू होत आहेत. चीनच्या विरोधात एकत्रितपणे ताकद दाखवण्याचा हा मार्ग आहे.
या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये १५ मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्या, अनेक विमाने तसेच टेहळणी करणारी हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत.
पुढील आठवड्यात हा युद्धाभ्यास सुरू होत आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनची मुजोरी वाढत असून, त्याचा त्रास जपानलाही होत आहे. त्या भागावरही चीन ताबा सांगत आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही अडथळे येत असल्याने चीनने ते थांबवावेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेच्या गस्ती नौकांनाही चीनचा त्रास होत आहे.