Mukesh Ambani: 4G-5G पेक्षा आई-बाप कितीतरी पटीने मोठे; मुकेश अंबानींचा तरुणाईला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:51 PM2022-11-22T21:51:46+5:302022-11-22T21:52:10+5:30
पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे.
रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनीच काही वर्षांपूर्वी देशभरात ४जी सेवा लाँच केली होती. आता ५जी सेवा देखील आणली आहे. करोडो लोक जिओद्वारे इंटरनेट डेटा वापरत आहेत. हे प्रमाण येत्या काळात आणखी वाढणार आहे. याच अंबानींनी तरुणवर्गाला या ४जी, ५जीवरून महत्वाचा सल्ला दिला आहे.
देशातील तरुणाई ४जी, ५जी वरून खूप उत्साहित आहेत, परंतू त्यांना सांगू इच्छितो की माताजी, पिताजी पेक्षा कोणताही जी मोठा नाहीय. तरुणांनी त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाला विसरता नये, असा सल्ला अंबानी यांनी दिला. याचबरोबर त्यांनी 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल, असे भाकीत केले. स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती आगामी काळात भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरतील, असेही ते म्हणाले.
पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. आज तुमचा दिवस आहे. पण तुमच्या पालकांनी या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली आहे. त्यांच्या आयुष्यभराचे स्वप्न होते, त्यांचा संघर्ष आणि त्याग कधीही विसरू नका, असे अंबानी म्हणाले. भारताचा अमृत काळ सुरु असताना ही बॅच एका पदवीधर होत आहे. आपल्या परंपरेत अमृत काळ हा कोणत्याही नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो. भारताची अभूतपूर्व आर्थिक वाढ होईल आणि संधींचा पूर येईल, असेही ते म्हणाले.
स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा मिळेल तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जेचा वापर योग्यरीतीने करण्यास मदत होईल. AI, रोबोटिक्स आणि IoT सारखे तंत्रज्ञान आमूलाग्र बदल घडवून आणतील. त्यांचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले.