पंतप्रधानपदासाठी मुखर्जी माझ्याहून अधिक पात्र होते - डॉ. मनमोहन सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 05:15 AM2017-10-15T05:15:05+5:302017-10-15T05:15:05+5:30
पंतप्रधानपदासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे माझ्याहून अधिक पात्र होते असे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी येथे केले. प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘द कोअॅलिशन इयर्स-१९९२-२0१२’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
नवी दिल्ली : पंतप्रधानपदासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे माझ्याहून अधिक पात्र होते असे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी येथे केले. प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘द कोअॅलिशन इयर्स-१९९२-२0१२’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
माझ्याहून अधिक योग्यता व पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी आपल्या नावाचा विचार झाला नाही वा आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार करण्यासाठी अनेक कारणे प्रणव मुखर्जी यांच्याकडे आहेत, असे सांगून मनमोहन सिंग म्हणाले की, अर्थात मला पंतप्रधान करण्यात आले आणि ते पद स्वीकारण्याखेरीज माझ्याकडे अन्य पर्याय नव्हता. पण त्यामुळे आम्हा दोघांच्या संबंधात काहीही फरक पडला नाही.
या समारंभाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हेही उपस्थित होते. माजी पंतप्रधानांच्या वरील विधानांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भाषणे झाली नाहीत.
डॉ. सिंग म्हणाले की, २00४ साली सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी माझी निवड केली, तेव्हा प्रणव मुखर्जी माझ्या प्रतिष्ठित व महत्त्वाच्या सहकाºयांपैकी एक होते. ते पंतप्रधान होण्यासाठी अधिक पात्र होते. त्यामुळे आपणास पंतप्रधान करण्यात आले नाही, अशी तक्रार करण्याचे कारण त्यांच्याकडे होते. मुखर्जी हे ठरवून राजकारणात आले.
देशातील एक सर्वोत्तम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मी मात्र अपघाताने राजकारणात आलो, पी. व्ही. नरसिंह राव यांनी मी अर्थमंत्री व्हावा, असा आग्रह धरला, तशी आॅफर त्यांनी मला दिली आणि तेव्हाच माझा राजकीय प्रवास सुरु झाला, याचा उल्लेख करून माजी पंतप्रधान म्हणाले की, यूपीए सरकार नीट चालण्याचे श्रेय प्रणव मुखर्जी यांना द्यायलाच हवे. जेव्हा कधी अडचण येत असे, तेव्हा आम्ही त्यांचा सल्ला घेत असू आणि तेच अडचणीतून मार्ग काढत असत. डॉ. मनमोहन सिंग यांनी शरद पवार यांच्यासारखा कर्तबगार नेताही आमच्या मंत्रिमंडळात होता, अशा शब्दांत त्यांचेही कौतुक केले.
या समारंभाला सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही प्रणव मुखर्जी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. मुखर्जी यांच्या स्मरणशक्तीचा उल्लेख करताना, त्यांनी ती हत्तीसारखी असल्याचे नमूद केले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सुधाकर रेड्डी, बसपाचे खा. सतीशचंद्र मित्रा, द्रमुकच्या नेत्या कणीमोळी यांचीही यावेळी भाषणे झाली. कोअॅलिशन इयर्स १९९६-२0१२ या पुस्तकात माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी १९९६ सालच्या संयुक्त मोर्चाच्या सरकारपासून यूपीए दोनच्या सरकारपर्यंतच्या कार्यकाळातील घडामोडींचा आढावा घेतला आहे.
माझी अपेक्षा होती
- काँग्रेसला २00४ साली विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान कोणाला करणार, यावर पक्षामध्ये तर्कवितर्क लढवले जात होते. सोनिया गांधी त्या पदासाठी माझी निवड करतील, अशी माझी अपेक्षा होती.
त्यांनी आधीच स्वत: पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला होता. माझा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, मला पंतप्रधान केले जातील, असे मला वाटत होते, असे प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.