Mukhtar Abbas Naqvi : केंद्रीय मंत्रिपद टिकविण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वींसमोर दोन पर्याय; मोदींनी राज्यसभेचा एक रस्ता बंद केला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:32 PM2022-05-31T14:32:57+5:302022-05-31T14:33:35+5:30
Rajyasabha Election : नक्वी यांना उमेदवारी न देऊन भाजपाने लोकसभेबरोबरच राज्यसभेतूनही मुस्लिम चेहरा गमावला आहे. नक्वी यांच्यासोबत आणखी दोन भाजपा खासदार मुस्लिम होते. त्यांनाही यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही.
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेचे तिकिट मिळाले नाही. त्यांचा कार्यकाळ ४ जुलैला संपत आहे. असे असले तरी नक्वी हे पुढील सहा महिने मंत्रिपदावर राहू शकतात. परंतू त्यांना या काळात राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्यत्व मिळवावे लागणार आहे. मोदींनी राज्यसभेचा एक दरवाजा बंद केला आहे. यामुळे नक्वींसमोर दोन पर्याय उरले आहेत.
Rajya Sabha Election: मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले; राजीनामा घेणार?
नक्वी यांना उमेदवारी न देऊन भाजपाने लोकसभेबरोबरच राज्यसभेतूनही मुस्लिम चेहरा गमावला आहे. नक्वी यांच्यासोबत आणखी दोन भाजपा खासदार मुस्लिम होते. त्यांनाही यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. राज्यसभा खासदार जफर इस्लाम यांना देखील तिकिट देण्यात आलेले नाही. आता नक्वींसमोर दोन पर्याय उरलेले आहेत.
नक्वी हे छत्तीसगढच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले होते. ते उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर जाऊ शकतात. आझम खान यांनी राजीनामा दिल्याने रामपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. नक्वी यांना रामपूरमधून उतरविले जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. नक्वी हे १९९८ मध्ये या जागेवरून खासदार झाले होते. परंतू, १९९९ आणि २००९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रामपूर मतदारसंघातून सपाचे अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवू शकतात.
दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारांचा. राज्यसभेत १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. सध्या पाचच सदस्य आहेत. सात जागा रिकाम्या आहेत. जर रामपूरमधून लोकसभेत जाऊ शकले नाहीत तर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून ते राज्यसभेत जाऊ शकतात.
आणखी एक मंत्री राजीनामा देणार...
जेडीयूने आरसीपी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत त्यांना मंत्रीपद सोडावे लागणार हे निश्चित आहे. आपण जुलैपर्यंत राज्यसभा सदस्य असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.