गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:09 PM2023-04-29T16:09:28+5:302023-04-29T16:10:19+5:30
याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली : मुख्तार अन्सारी यांच्यानंतर त्यांचा खासदार भाऊ अफजल अन्सारी यांनाही गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. गाझीपूरच्या खासदार एमएलए न्यायालयाने अफजल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा जाहीर होताच अफजल अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुख्तार अन्सारी यांना बांदा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली होती.
दरम्यान, 23 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयात खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, न्यायालयाने निर्णयासाठी 15 एप्रिलची तारीख दिली होती, मात्र पीठासीन अधिकारी रजेवर असल्याने निर्णय होऊ शकला नाही.
अखेर 29 एप्रिलला म्हणजेच आज निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. गँगस्टर प्रकरणात दोन वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. दरम्यान, आता गँगस्टर प्रकरणात अफजल अन्सारी यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदाराचे सदस्यत्व संपते.
मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार
मुख्तार अन्सारी सध्या उत्तर प्रदेशमधील रोपर येथील तुरुंगात आहेत. या तुरुंगात अन्सारी यांना महत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जात आहे. अन्सारी यांच्यासाठी तुरुंगात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सोय करण्यात आली आहे, असा आरोप पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारने केला आहे. तसेच अन्सारी यांना उत्तर प्रदेशमधून पंजाबमध्ये हलवण्यात आल्यामुळे भगवंत मान सरकारकडून मागील सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी असून ते माऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत.