तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारीला स्वत:च्या हत्येची भीती; न्यायालयाने दिले 'हे' निर्देश!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:29 PM2023-05-03T15:29:16+5:302023-05-03T15:29:31+5:30
मुख्तार अन्सारीच्या वतीने त्याची पत्नी अफशा अन्सारीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गँगस्टर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या मुख्तार अन्सारी याला स्वत:च्या हत्येची भीती आहे. दरम्यान, माफिया मुख्तार अन्सारी याने अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर स्वत:च्या हत्येची भीती व्यक्त केली असून कारागृहातून बाहेर जाताना योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याआधी मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्तार अन्सारी आणि अब्बास अन्सारी न्यायालयात हजर झाले होते. यादरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीच्या विशेष न्यायालयात त्यांचा जबाब नोंदविला होता.
मुख्तार अन्सारीच्या वतीने त्याची पत्नी अफशा अन्सारीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्तार अन्सारीच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने डीजी जेलला निर्देश दिले आहेत. या निर्देशात न्यायालयाने डीजी जेलला मुख्तार अन्सारीची सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला कोठेही थांबवले जाणार नाही किंवा न्यायालयासमोर उभे केले जाणार नाही, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. यासोबतच मीडियाला पोलीस आणि ब्रज वाहनाच्या ताफ्यापासून दूर ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, मुख्तार अन्सारीला गँगस्टर अॅक्टच्या 14 वर्षे जुन्या प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच, मुख्तार अन्सारी यालाही गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. अफजल अन्सारीला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्तार आणि अफजल अन्सारी याच्याविरुद्ध मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्तार अन्सारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांदा कारागृहाशी संबंधित होता. २००५ मध्ये कृष्णानंद राय यांची मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टीजवळ हत्या करण्यात आली होती. मुख्तार अन्सारी सध्या तुरुंगात आहे. विशेष म्हणजे, मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी असून ते माऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत.