मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, गाझीपूरच्या MP-MLA न्यायालयाने दिला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 02:10 PM2023-04-29T14:10:35+5:302023-04-29T14:11:19+5:30
गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने शनिवारी गँगस्टर अॅक्ट प्रकरणात मुख्तार अन्सारीवर निकाल दिला.
मुख्तार अन्सारी याला गँगस्टर ऍक्ट प्रकरणात शनिवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे. गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने १६ वर्षे जुन्या प्रकरणात माजी आमदाराला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने शनिवारी माजी आमदार मुख्तार अन्सारी यांना गँगस्टर अॅक्ट प्रकरणात शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने त्यांना दहा वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंडही ठोठावला. हे प्रकरण भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात बसपाचे विद्यमान खासदार आणि मुख्तार अन्सारी यांचा भाऊही गँगस्टर कायद्याखाली आहे.
प्रकरण काय आहे?
मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध हे गुन्हे भाजपचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मुख्तार आणि अफजाज अन्सारी याच्याविरुद्ध मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्तार अन्सारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांदा कारागृहाशी संबंधित होता. २००५ मध्ये कृष्णानंद राय यांची मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टीजवळ हत्या करण्यात आली होती.
मुख्तार अन्सारी सध्या यूपीच्या बांदा तुरुंगात बंद आहे. मात्र, १५ एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र शनिवारी न्यायालयाने निकाल दिला. निकाल सुनावण्यापूर्वी गाझीपूर येथील न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुख्तार अन्सारी हे मऊ विधानसभा मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिले आहेत.