शाब्बास पोरा! वडील वीटभट्टीवर मजूर, घरची परिस्थिती अत्यंत बिकट; लेक मेहनतीने UPSC उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:40 AM2023-06-13T11:40:47+5:302023-06-13T11:44:44+5:30
पावसाळ्यात छतावरून घरामध्ये पाणी गळायचं, पण ते दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. मुक्तेंद्रला या परिस्थितीने आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा दिली.
जर तुम्ही ध्येय निश्चित केले असेल आणि प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. अनेकदा असं म्हटलं जातं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने मेहनत करणं थांबवता कामा नये, कारण शेवटी यश नक्की मिळतं. ज्याला ही गोष्ट खऱ्या आयुष्यात कळते, तोच काहीतरी मोठे करतो. उत्तर प्रदेशच्या मुक्तेंद्र कुमार याने हे सिद्ध केलं आहे. त्याच्या संघर्षाची गोष्ट जाणून घेऊया...
मुक्तेंद्र कुमार हा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचे वडील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. त्याच्या घराची परिस्थिती अशी होती की, पावसाळ्यात छतावरून घरामध्ये पाणी गळायचं, पण ते दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. मुक्तेंद्रला या परिस्थितीने आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा दिली.
मुक्तेंद्र सांगतो की, त्याचं पहिले ध्येय आपल्या कुटुंबाची स्थिती सुधारणे हे होतं. पूर्वी त्याला फक्त एसएससी परीक्षेबद्दल माहिती होती, पण जेव्हा त्याला यूपीएससीची माहिती मिळाली तेव्हा त्याने ती पास होण्याचा निर्णय घेतला. मुक्तेंद्र कुमारने सलग तीन वर्षे यूपीएससीची तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून आपला निर्धार दाखवून दिला. 2022 च्या UPSC परीक्षेत त्याने 819 वा क्रमांक मिळविला आहे.
विशेष म्हणजे मुक्तेंद्रने ही परीक्षा हिंदी मीडियममधून उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. आता मुक्तेंद्रला त्याचे घर दुरुस्त करायचे आहे आणि त्याच्या बहिणीचे लग्न थाटामाटात करायचे आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत बिकट पार्श्वभूमीतून आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची गोष्ट प्रेरणादायी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.