बंगालमध्ये ‘मुक्ती आलो’ योजना
By admin | Published: February 13, 2016 02:16 AM2016-02-13T02:16:19+5:302016-02-13T02:16:19+5:30
आशियातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक असलेल्या सोनागाछी येथील वारांगना आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. मालिका व चित्रपटांमध्ये
कोलकाता : आशियातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक असलेल्या सोनागाछी येथील वारांगना आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. मालिका व चित्रपटांमध्ये करिअर घडविण्याच्या या महिलांच्या महत्त्वाकांक्षेला नवे धुमारे फुटले असून अभिनयासह, नृत्य आणि गायनाचे धडे त्या घेत आहेत.
देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याला नवी झळाळी देण्यासाठी प. बंगाल सरकारने ‘मुक्ती आलो’ (स्वातंत्र्याचा प्रकाश) नावाने एक योजना हाती घेतली आहे. देहविक्री व्यवसाय सोडून नवा व्यवसाय करून सन्मानजनक आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्याच्या महिला विकास व सामाजिक विकासमंत्री शशी पांजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात या स्त्रिया व त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
याच योजनेंतर्गत देहविक्रय करणाऱ्या एका स्त्रियांच्या गटाला नृत्य, अभियन व गायनाचे प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून त्या क्षेत्रात काम करू शकतील. (वृत्तसंस्था)
सोनागाछी रेड लाईट एरियात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. देहविक्री व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलेल्या अनेक मुलींना या संस्थांनी बाहेर काढले.
या महिला व मुलींना सन्मानजनक आयुष्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पश्चिम बंगाल सरकारचे प्रयत्न आहेत.
याच प्रयत्नांतून नवे आयुष्य घडविण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी कार्यशाळा घेतली जात आहे. या कार्यशाळेत अभिनय शिकवला जात आहे.