लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 05:29 PM2018-05-15T17:29:09+5:302018-05-15T17:29:09+5:30
मुकुल रोहतगी 2014 ते 2017 या कालावधीत अॅटर्नी जनरल होते.
नवी दिल्ली- लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष हे पद रिक्त असल्यामुळे लोकपाल निवडीसाठी विलंब होत होता. केंद्र सरकारने आज आपण मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ या लोकपाल समितीमधील पदावर नेमणूक करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 11 मे रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकपाल समितीत मुकुल रोहतगी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपिठाला सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर 2014 साली रोहतगी यांची नेमणूक महान्य़ायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र जून 2017मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो. यापुर्वी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे 11 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाल्याने ते पद रिक्त होते.