बंगालमध्ये दिदींचा खेला! भाजपला मोठा झटका? बडा नेता घरवापसीच्या तयारीत; घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:32 PM2021-06-11T13:32:48+5:302021-06-11T13:38:21+5:30
भाजपचा बडा नेता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; आज संध्याकाळी ममता बॅनर्जींना भेटणार
कोलकाता: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींची पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
BJP National Vice President Mukul Roy is likely to join TMC. The decision regarding his joining will be taken after his meeting with the party's top brass in Kolkata today: Sources
— ANI (@ANI) June 11, 2021
(file photo) pic.twitter.com/Q26UmmXX1h
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली होती. अनेक आमदारांनी हाती कमळ घेतलं. मात्र तरीही तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत राज्यात हॅटट्रिक साधली. भाजपमध्ये सत्तेच्या आशेनं गेलेल्या नेत्यांची आता चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मुकूल रॉय यांचा क्रमांक वरचा आहे. मुकूल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला रामराम केला होता. मात्र आता ते तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात.
निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तृणमूलच्या नेतृत्त्वानं मुकूल रॉय यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. यानंतर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून भाजपमध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात असल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.
बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन
मुकूल रॉय सध्या कृष्ण नगर मतदारसंघाचे आमदार आहेत. तृणमूलमध्ये असताना मुकूल रॉय ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय साथीदार होते. पक्षात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. त्यामुळेच तृणमूलला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपनं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मुकूल रॉय यांच्या पत्नीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. ममता बॅनर्जींनी विविध माध्यमांतून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.