मुलायम यांच्याकडे जाणार मुख्यमंत्रिपद ?
By admin | Published: October 24, 2016 03:39 AM2016-10-24T03:39:46+5:302016-10-24T10:21:15+5:30
उत्तरप्रदेशात चार मंत्र्यांना हटविल्यानंतर आलेले राजकीय वादळ थोपविण्यासाठी आता पक्ष प्रमुख मुलायम सिंह यादव हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वत: कडे घेऊ शकतात
मीना कमल, लखनौ
उत्तरप्रदेशात चार मंत्र्यांना हटविल्यानंतर आलेले राजकीय वादळ थोपविण्यासाठी आता पक्ष प्रमुख मुलायम सिंह यादव हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वत: कडे घेऊ शकतात. शिवपाल सिंह यादव यांच्यासह जुन्या तमाम नेत्यांनी संकटाच्या या काळात नेताजींना (मुलायम सिंह) पुढे येण्याची विनंती केली आहे.
सरकार आणि संघटनेबाबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी मुलायम सिंह यांनी रविवारी दुपारी अचानक आपल्या दोन सुना डिंपल यादव आणि अपर्णा यादव यांच्याशी चर्चा केली. ही पहिली वेळ आहे की, सपातील या गृहयुद्धात दोन्ही सुनांचाही प्रवेश झाला आहे. मुलायम सिंह यादव हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेनंतर रविवारी त्यांच्या निवासस्थानी शासकीय अधिकाऱ्यांची ये -जा वाढली आहे. तथापि, आपल्या पुढील पाऊलांबाबत मुलायम सिंह यांनी जरी पत्ते उघडले नसले तरी अधिकाऱ्यांची वर्दळ बरेच काही सांगून जाणारी आहे.
राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींकडे राजभवनाचे बारीक लक्ष आहे. यात राजभवनाची भूमिका महत्वाची असते. पूर्ण घटनाक्रमावर राज्यपाल राम नाईक लक्ष देऊन आहेत.
अमरसिंह घेऊ लागले सल्ला
सपातील या राजकीय घडामोडीत अखिलेश यादव यांच्याकडून खलनायकाची उपमा देण्यात आलेले राज्यसभा सदस्य अमर सिंह हे आता कायदेशीर लढाईसाठी सल्ला घेत आहेत. याच दरम्यान, मुलायम सिंह यादव आणि अमर सिंह यांची फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्य सचिव राहुल भटनागर आणि प्रमुख सचिव अनीता सिंह यांना सूचना दिल्या आहेत की, आपल्या परवानगीशिवाय कोणताही आदेश जारी करण्यात येऊ नये. पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्याचे आदेश ऐकू नयेत, अशाही सूचना दिल्या आहेत. प्रमुख सचिव अनीता सिंह या मुलायम सिंह यांच्या निकटवर्तीय आहेत, त्यामुळेच हे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे बेरजेचे राजकारण
मुख्यमंत्रीपदावरुन हटविले जाण्याच्या शक्यतेने अखिलेश यादव यांनी विधिमंडळ दलाच्या बैठकीत आमदारांचे समर्थन मिळविले आहे. जर अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याचा प्रयत्न झाला तर ते आमदारांचे बहुमत असल्याचा दावा करु शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या बरखास्तीच्या अगोदरच शिवपाल सिंह यादव, माता प्रसाद पांडे, रेवती रमण सिंह, अंबिका चौधरी, बेनी प्रसाद वर्मासह अन्य तमाम जुने नेते मुलायम सिंह यादव यांना भेटले आणि संकटाच्या काळात पुन्हा जबाबदारी स्वत:कडे घेण्याची मागणी केली. बहुतांश जुन्या नेत्यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंंत्रीपदी ठेवण्यास विरोध केला आहे.
या साली शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्याऐवजी खुद्द मुलायमसिंह यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र रामगोपाल यादव यांनी उलट अखिलेश यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी दबाव टाकला होता. तेव्हापासून हा गृहकलह कायम आहे.