मुलायम माझे वडील, कधीच तुटणार नाहीत आमचे संबंध - अखिलेश
By Admin | Published: January 17, 2017 12:59 PM2017-01-17T12:59:03+5:302017-01-17T12:59:03+5:30
समाजवादी पक्ष आणि आणि सायकल या निवडणूक चिन्हावरील हक्कावरून सुरू असलेल्या वादात बाजी मारल्यानंतर
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 17 - समाजवादी पक्ष आणि आणि सायकल या निवडणूक चिन्हावरील हक्कावरून सुरू असलेल्या वादात बाजी मारल्यानंतर अखिलेश यादव यांनी मुलायम यांच्याशी आपला कधीच वाद नव्हता, असे म्हटले आहे. मुलायम सिंह यादव माझे वडील आहेत. त्यामुळे आमच्यातील संबंध कधीच तुटणार नाहीत, असे अखिलेश यादव यांनी आज सांगितले. तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असून, त्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
लखनौ येथील सरकारी निवासस्थानी पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अखिलेश यांनी मुलायम यांच्याशी आपले मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, " वडलांसोबतचे माझे संबंध कधीच तुटणार नाहीत, त्यांच्यासोबत माझे मतभेद कधीच नव्हते. पण काही कारणास्तव ही लढाई होणे आवश्यक होते."
यावेळी समाजवादी पक्षाचे सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळेल याची खात्री होती असेही अखिलेश यांनी सांगितले." माझ्याकडे आता मोठी जबाबदारी आली आहे. आता आमचे पूर्ण लक्ष उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सरकार बनवण्यावर आहे, तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असून येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, " असे अखिलेश म्हणाले.