मुलायमसिंग यांची लालूंकडून मनधरणी
By admin | Published: September 4, 2015 10:49 PM2015-09-04T22:49:09+5:302015-09-04T23:43:39+5:30
समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव
नवी दिल्ली : समाजवादी पार्टी बिहारमधील भाजपाविरोधी आघाडीमधून अचानकपणे बाहेर पडल्याने थक्क झालेले संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आघाडी वाचविण्यासाठी शुक्रवारी मुलायमसिंग यांची भेट घेतली; परंतु सपाप्रमुखाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळविण्यात त्यांना अपयश आले.
राजद, संजद आणि काँग्रेसने जागा वाटपाबाबत पक्षाशी मुळीच संपर्क साधला नाही. हा आपला घोर अवमान आहे, असे सांगत सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा गुरुवारी लखनौ येथे केली होती. या घोषणेमुळे हादरलेल्या संजद आणि राजद यांनी आता आघाडी वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
‘चर्चा सुरू आहे. चर्चा सुरूच राहील. सर्व २०० जागा नेताजी (मुलायमसिंग) आणि समाजवादी पार्टीच्याच आहेत. एकत्र आलो तेव्हा भाजपाला पराभूत करू असा संदेश देशात गेला होता. ते (मुलायमसिंग) आमचे संरक्षक आहेत. देशाला सांप्रदायिकतेपासून धोका आहे. सांप्रदायिकता नष्ट व्हावी, असे सर्वांनाच वाटते. बिहारमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे यासाठी आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही नेताजींना केली आहे,’ असे लालूप्रसाद यादव म्हणाले. मुलायमसिंग यांच्यासोबत दोन तास चाललेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लालूप्रसाद यांच्यासह शरद यादव यांनीही मुलायमसिंग यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
सपाप्रमुखाकडून कोणतेही आश्वासन मिळाले नसले तरी शरद यादव यांनी ‘सर्वकाही ठीक होईल,’ अशी आशा व्यक्त केली. चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत आनंदाची वार्ता कळेल. हा जागांचा वाद नाही. काही अंतर्गत बाबी आहेत, ज्यावर मीडियाशी चर्चा करता येणार नाही, असे शरद यादव म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशात आपला राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला आघाडीत स्थान मिळाल्यामुळे मुलायमसिंग यादव नाराज असल्याचे सपाच्या एका नेत्याने सांगितले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्यापूर्वी पक्षाशी संपर्क न साधणाऱ्या राजद, संजद आणि काँग्रेसने आपला घोर अवमान केला, असा आरोप करून सपाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या जागावाटप फार्म्युल्याअंतर्गत राजदने ९८, संजदने १०० आणि काँग्रेसने ४० जागा स्वत:कडे ठेवून सपासाठी केवळ पाच जागा सोडल्या होत्या. दरम्यान, या मुद्यावर तोडगा निघेल आणि सपा महाआघाडीत परत येईल, अशी आशा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे.